Weather Forecast : येत्या महीन्यात सूर्य आग ओकणार! उद्यापासून शाळांच्या वेळेत बदल; जळगाव ४१ अंशांवर
Weather Forecast : मार्चच्या मध्यावरच राज्याचा पारा ४० पार गेला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळा सकाळी ७ ला भरवण्याचा निर्णय घेण्यात आला

Weather Forecast : मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असून, अनेक जिल्ह्यांत उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात उन्हाळा अधिक तीव्र असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
या वाढलेल्या उष्णतेचा परिणाम म्हणून काही जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. उन्हाचा पार 40 अंशांजवळ पोहोचला असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा परिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
हा बदल उद्या म्हणजेच सोमवारपासून (16 मार्च) केला जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम आहे. मुंबईत आर्द्रता जास्त असल्याने उकाडा जाणवेल, मात्र पावसाची शक्यता नाही.
मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची जळगावमध्ये नोंद करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्याचा तापमान 41 अंशांवर पोहोचले आहे. परंतु, हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.





