Maharashtra State Film Award: राज्य शासनाचे मराठी चित्रपट पुरस्कार येत्या 21 ऑगस्ट रोजी

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये बुधवार, दि. 21 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
शासनामार्फत 58 आणि 59 वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार यंदा एकाच वेळी प्रदान केले जाणार आहेत. त्याचबरोबर 2023 मधील चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (10 लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना तर स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ( 10 लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना या पुरस्कार सोहोळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
यासोबतच, 2023 चा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार (6 लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) लेखक-दिग्दर्शक, अभिनेते दिग्पाल लांजेकर यांना तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार (6 लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह) जेष्ठ लेखक- दिग्दर्शक-संकलक एन.चंद्रा यांना प्रदान करण्यात येणार आहे.
यासोबतच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रदान करण्यात येणार असून प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना चित्रपटांसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2024 आणि कंठसंगीतासाठी प्रख्यात गायक सुदेश भोसले यांना सन्मानित करण्यात येणार आहे.





