शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांना “कर्जमाफी’ची दिवाळी भेट; ‘या’ बॅंकेतून घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ

मुंबई – राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भूविकास बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. जवळपास 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर याबाबतची घोषणा केली आहे. सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा काहीअंशी दिलासादायक निर्णय असून राज्य सरकारकडून दिवाळीची एक गोड भेट असल्याचे सांगितले जात आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व निर्णय पाहा या व्हिडीओद्वारे –
नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इस्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्र स्थापन करणार, भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, एमपीएससीच्या कक्षेबाहेरील पदांच्या परीक्षा टीसीएस, आयबीपीएसमार्फत घेणार… यासह इतर #मंत्रिमंडळनिर्णय पाहा.#CabinetDecisions pic.twitter.com/wQNekvp19i
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 20, 2022
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीसह गृह, महसूल, पणन, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय अशा वेगवेगळ्या विभागांशी निगडीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये भू-विकास बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब, गट-क, गट-ड या पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीबीएस घेणार आहे. या माध्यमातून 75हजार पदे भरण्यात येणार आहेत. ऐच्छिकरित्या वाहनाचे स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज आणि दंड माफ करण्यात येणार आहे. 5 जी साठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्यासाठी दूरसंचार पायाभूत सुविधांविषयी धोरण, राज्यात महिलांचे 2800 बचतगट निर्माण करणार यांसह आदी निर्णय घेण्यात आले.





