Ambegaon News : दिलीप वळसे-पाटलांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांना आधार ; रब्बी हंगामासाठी कोट्यवधींचे कर्जवाटप

प्रभात वृत्तसेवा
मंचर – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील सुमारे 9476 शेतकर्यांना रब्बी हंगामाचे पिक कर्ज वाटप 66 कोटी 51 लाख 71 हजार रुपयांचे करण्यात आल्याची माहिती आंबेगाव तालुका विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड यांनी दिली.जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील 15 शाखांना संलग्न असणार्या विकास संस्थामार्फत रब्बी हंगामाचे पीक कर्ज वाटप दि. 1 ते 18 ऑक्टोबरअखेर 66 कोटी 51 लाख 71 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.
पीक कर्जवाटप प्रसंगी मंचर शाखेत वसुली अधिकारी नितीन थोरात, सहाय्यक विभागीय अधिकारी एल. बी. थोरात, विकास अधिकारी मंचर शाखेचे राजेश पाचारणे उपस्थित होते. यावर्षी रब्बी हंगामात 88 कोटी 35 लाख रुपयांचे पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून येत्या आठवड्याभरात कर्ज वाटप प्रक्रिया पूर्ण होईल.अशी माहिती विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड यांनी दिली. ते म्हणाले कांदा, बटाटा, टोमॅटो यांना पीक कर्ज वाटप केले जाते. मुदतीत पीक कर्ज भरल्यावर शून्य टक्के दराने कर्ज वापरायला मिळते. खानदेश, मराठवाड्यातील पूरग्रस्तांना विविध कार्यकारी सोसायटी यांच्या माध्यमातून ऐच्छिक स्वरूपात सुमारे दोन लाख 36 हजार रुपयांचे 338 किराणा किट वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
“सध्या विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून अनेक प्रकारचे व्यवसाय सुरु असून रेशनिंग, कापड दुकान, जलशुद्धीकरण केंद्र, माहिती सुविधा केंद्र इत्यादी व्यवसाय सोसायट्यानी सुरू केले असून जारकरवाडी येथे लवकरच जारकरवाडी विविध कार्यकारी सोसायटी कापड दुकान व्यवसाय सुरू करीत असल्याचे सांगण्यात आले. सर्व विकास संस्थांनी फक्त पीक कर्ज वाटप न करता अश्याच प्रकारे अनेक व्यवसाय सुरु करावेत.”
-दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ संचालक जिल्हा बँक





