एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; राज्यसभेसाठी ‘या’ नेत्याचे नाव निश्चित?
Rajya Sabha election 2026: महाराष्ट्र राज्यसभा निवडणूक २०२६ साठी राष्ट्रवादीकडून पार्थ पवार तर शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांचे नाव निश्चित मानले जात आहे.

Rajya Sabha election 2026 : राज्यातील सात राज्यसभा जागांसाठी १६ मार्चला होणाऱ्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. महायुतीच्या वाट्याला सहा जागा येत असून त्यापैकी चार जागा भाजप, एक शिवसेना (शिंदे गट) आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या खात्यात जाणार आहे.
राष्ट्रवादीकडून पार्थ पवार निश्चित
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या एकमेव जागेसाठी पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता राष्ट्रवादीकडे ४० आमदार असल्याने त्यांचा उमेदवार सहज विजयी होईल, असे चित्र आहे.
भाजपमध्ये २५ इच्छुक; दिग्गजांची नावे चर्चेत
भाजपच्या चार जागांपैकी एक जागा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासाठी राखीव ठेवली जाण्याची शक्यता आहे. उर्वरित तीन जागांसाठी तब्बल २५ इच्छुकांनी अर्ज केला आहे. यामध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर, विनय सहस्त्रबुद्धे, भागवत कराड, धैर्यशील पाटील, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे आणि भारती पवार यांची नावे चर्चेत आहेत. अंतिम निर्णयासाठी भाजपच्या केंद्रीय समितीकडे यादी पाठवण्यात आली आहे.
शिंदे सेनेकडून राहुल शेवाळे आघाडीवर?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एकमेव जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची गरज शिंदेंसमोर आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर शेवाळे शिंदेंसोबत ठाम राहिले. २०२२ च्या बंडावेळी खासदारांचा गट शिंदेंसोबत नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दोन वेळा खासदार राहिल्यामुळे संसदेच्या कामकाजाचा अनुभवही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे संसदेत पक्षाची प्रभावी बाजू मांडण्यासाठी ते योग्य उमेदवार ठरू शकतात, असे मानले जात आहे.
या जागेसाठी गजानन कीर्तिकर, संजय निरुपम आणि आनंदराव अडसूळ यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, शेवाळेंचे नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा रंगली आहे.
2022 ची पुनरावृत्ती?
महाविकास आघाडीत एकमेव जागेवरून मतभेद सुरू असल्याने सातही जागांवर निवडणूक रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर आठ उमेदवार रिंगणात उतरले, तर २०२२ प्रमाणे चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. आता सर्वांचे लक्ष भाजपच्या अंतिम निर्णयाकडे आणि शिंदे यांच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.



