Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात ऑक्टोबरअखेर पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती असताना ऑक्टोबरअखेरीस काही भागांत पावसाची शक्यता आहे. IMD च्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता जाणून घ्या.

Maharashtra Rain Update : राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. रब्बी हंगामाची पेरणी झाली असून परतीचा चांगला पाऊस पडावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. दरम्यान, राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
त्यामुळे सरकारकडून शेतकरी, मजूर आणि सामान्य नागरिकांना विविध माध्यमातून मदत केली जात आहे. अशातच राज्यासाठी दिलासादायक हवामान अंदाज समोर आला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, २६ ऑक्टोबरनंतर तेथे चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबरपासून देशातील काही भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.
22 Oct, Extended Range Forecast for coming 4 weeks period by IMD for rainfall & cyclogenesis.
Possibility of above normal rainfall activities over parts of South India throughout & other places as shared here.ऑक्टोबरच्या अखेरीस महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता ! https://t.co/WidG0sChZF
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 22, 2026
आंध्र प्रदेशात २९ ऑक्टोबरच्या आसपास पावसाची शक्यता असून, महाराष्ट्रातही महिन्याच्या अखेरीस काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
आयएमडीने पुढील चार आठवड्यांसाठीही हवामानाचा अंदाज दिला आहे. दक्षिण भारतासह पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भागांत पाऊस होऊ शकतो. मध्य भारतातील अनेक भाग तसेच पूर्व उत्तर प्रदेशातही पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, राज्यातील सुमारे ५३ लाख हेक्टर रब्बी क्षेत्रापैकी केवळ २० ते २५ लाख हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. त्यामुळे परतीचा पाऊस न झाल्यास पेरणी झालेल्या पिकांनाही मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची गरज आहे.
ऑक्टोबरअखेरीस पावसाची शक्यता व्यक्त झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत. आगामी काही दिवसांत पाऊस प्रत्यक्षात किती पडतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.





