राज्यात आज पुन्हा कोसळधार ; ‘या’ दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain । राज्याच्या विविध भागात सध्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
‘या’ दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट Maharashtra Rain ।
हवामानशास्त्र विभागाने प्रवासाविषयी माहिती देताना, आज राज्यातील दोन जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये रत्नागिरी आणि विदर्भातील गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. या दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळं या दोन जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
तर दुसरीकडे राज्यातील नऊ जिल्ह्यात हवामानशास्त्र विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी Maharashtra Rain ।
दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह पालघर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.





