Pune news : अतिरिक्त कार्यभार सोपविण्यातही वशिलेबाजीचा शिरकाव; दिग्गज व कर्तव्यदक्ष अधिकारी अस्वस्थ

पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा अन्य अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. यात क्रिमी कार्यालयाचा कार्यभार सोपविताना वशिलेबाजीचा शिरकाव मोठया प्रमाणात झाला आहे. काही निष्क़ीय व चौकशांच्या फेरीत अडकलेल्या अधिकाऱ्यांना हेतुपुरस्सर महत्वपुर्ण कार्यालयात महत्वाच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
यामुळे बहुसंख्य दिग्गज अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. राज्यातील नऊ कार्यालयातील शिक्षण उपसंचालकांची पदे रिक्त झालेली आहे. त्या पदांचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला आहे.
त्यात डॉ. वंदना वाहुळ – पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक, देवीदास कुलाल – राज्य मंडळ सचिव, रजनी रावडे – शिक्षण आयुक्तालय शिक्षण उपसंचालक, ज्योती शिंदे – विद्या प्राधिकरण शिक्षण उपसंचालक, अ.रा.भंडारी – लातुर बोर्ड अध्यक्ष, ज्योत्स्ना शिंदे – मुंबई बोर्ड सचिव, डॉ.बी.बी.चव्हाण – छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण उपसंचालक, निलीमा टाके – अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक याप्रमाणे अधिकारी यांना संबंधित कार्यालयात अतिरिक्त कार्यभाराने बक्षीसीच मिळालेली आहे.
अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचे आदेश निघण्यापुर्वी सेंट्रल बिल्डींगमधील एका संचालक कार्यालयात काही अधिकाऱ्यांच्यात मोठी खलबतेही झाली आहेत. काहींचे पत्ते कट करत अन्य अधिकारी यांच्याकडे जाणीवपुर्वक सोयीसाठी अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आले असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे.
डॉ.वंदना वाहुळ, वैशाली जामदार, डॉ. गणपत मोरे यांची चौकशींची प्रकरणे अद्याप निकाली निघालेली नाहीत. शैलजा दराडे यांना निलंबित केलेले आहे. त्यामुळे या चारही अधिकाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचितच रहावे लागले.
औदुंबर उकिरडे, हारुन अत्तार या दोघांनाही पात्र असतानाही पदोन्नतीच्या यादीत नाव समाविष्ट करण्यात आलेच नाही. एक शिक्षण उपसंचालक शिक्षण व्यवस्थेतील वशिलेबाजीला कंटाळून स्वेच्छा निवृत्त्ती घेण्याच्या मानसिकतेत आहे. एक-दोन शिक्षण उपसंचालक न्यायासाठी मॅट मध्ये धाव घेण्याची चाचपणी करत आहेत.
पदोन्नती नाकारण्याचा धडाका !
राज्यातील विविध कार्यालयातील शिक्षण उपसंचालकांना सहसंचालकपदी पदोन्नती देण्यात आलेली आहे. यातील शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांची कोल्हापुर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी काही वैयक्तीक कारणास्तव पदोन्नती नाकारली आहे.
अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे यांची नागपुर बोर्डाच्या अध्यक्षपदी पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आलेली आहे. मात्र त्यांनीही अद्याप पदोन्नती स्वीकारलेली नाही. ते अचानक रजेवर गेले आहेत.
संदिप संगवे यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात अनेक वर्षांपासून कायम तळ ठोकलेला आहे. या मुंबई कार्यालयातील शिक्षण उपसंचालक पदाचे सहसंचालक या पदावर उच्चीकरणासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत.





