मुंबई : येत्या काही महिन्यांमध्ये स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडणार आहेत. यादरम्यान मविआचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. येत्या चार महिन्यांत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. या आदेशानंतर आता निवडणूक आयोगासह राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यावेळी महापालिकेच्या निवडणुकीत आपलाच झेंडा फडकावा, यासाठी राजकीय पक्षांकडून विशेष रणनीती आखली जात आहे. यादरम्यान एमआयएम या पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका मविआला बसण्याची शक्यता आहे. MIM ने काय घेतला निर्णय ? MIM पक्ष महापालिकेच्या निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढवणार आहे. लवकरच सदस्यता मोहीम राबवणार आहोत. फक्त महानगर पालिकाच नाही, तर सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या जाणार आहेत, असे MIM पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले. एमआयएमच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्कीच मविआचं टेन्शन वाढणार आहे. मविआला कसा बसणार फटका? महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या तीन प्रमुख पक्षांचा समावेश आहे. राज्यातील काही मुस्लीम मतदार या तिन्ही पक्षांना मतदान करतात. पण एमआयएमने महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याचे ठरवल्याने मुस्लीम मतदार या पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. आणि जर असे झाले तर महाविकास आघाडीला मतविभाजनाचा फटका बसू शकतो. अद्याप तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात अजून काय राजकीय घडामोडी घडतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.