Maharashtra Politics : शरद पवारांना धक्का! ‘या’ माजी आमदाराने सोडली साथ

Maharashtra Politics : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ आणि पाचोऱ्याचे माजी नगराध्यक्ष संजय वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजप मुख्यालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि माजी मंत्री सतीश पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दिलीप वाघ हे देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हुलकावणी देत दिलीप वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने पाचोरा भडगाव मतदार संघातील राजकीय सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी दोन चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना माजी आमदार दिलीप वाघ आणि पाचोऱ्याचे माजी नगराध्यक्ष संजय वाघ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दिलीप वाघ आणि संजय वाघ यांच्या प्रवेशामुळे भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये मोठा फायदा होईल.





