Maharashtra Politics : पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळले? ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’!
राज्यात सध्या विधानपरिषदेच्या १७ जागांसाठीच्या निवडणुकीचे वातावरण (Maharashtra Politics) कमालीचे तापले आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ उमेदवारांकडे आहे.

Maharashtra Politics : राज्यात सध्या विधानपरिषदेच्या १७ जागांसाठीच्या निवडणुकीचे वातावरण (Maharashtra Politics) कमालीचे तापले आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ उमेदवारांकडे होती.
ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीच्या नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र, एकीकडे या राजकीय घडामोडी घडत असतानाच (Maharashtra Politics) दुसरीकडे अमरावतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अत्यंत मोठा झटका बसला आहे.
ठाकरे गटाचे अमरावती जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून सोडचिठ्ठी?
मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि नाराजीमुळे नरेंद्र पडोळे यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच पडोळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अमरावतीत ठाकरे गटाला मोठी खिळ बसली आहे.
नरेंद्र पडोळे यांच्याकडे अचलपूर आणि मेळघाट विधानसभा क्षेत्राची जिल्हाप्रमुख म्हणून महत्त्वाची जबाबदारी होती. त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
बच्चू कडूंच्या मध्यस्थीने ‘गेमचेंजर’ हालचाली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांच्या या प्रवेशामुळे अमरावती आणि अचलपूर परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढणार असल्याचे बोलले जात होते, ते आता खरे ठरताना दिसत आहे.
नरेंद्र पडोळे यांनी राजीनामा देण्यापूर्वी बच्चू कडू यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रदीर्घ चर्चेनंतरच पडोळे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. लवकरच बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र पडोळे आणि त्यांचे असंख्य समर्थक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. यामुळे या भागात शिंदे गटाचे पारडे कमालीचे जड झाले आहे.
ठाकरे गटाला मोठी ‘घरघर’
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला राज्यभरात मोठी घरघर लागल्याचे चित्र आहे. अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अमरावतीतील या ताज्या घडामोडीमुळे ठाकरे गटाच्या गळतीचे सत्र थांबवण्यात नेतृत्वाला अपयश येत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी!
एकीकडे अमरावतीमध्ये जिल्हाप्रमुखांनी राजीनामा दिला असतानाच, दुसरीकडे ठाकरे गटाकडून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कडक कारवाईचे सत्रही सुरू आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळ माने यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी (Maharashtra Politics) करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.






