Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का ! प्रज्ञा सातव यांच्यानंतर ‘हा’ नेता सोडणार साथ

मुंबई : सध्या महानगरपालिकांचे (Maharashtra Politics) बिगुल वाजलं आहे. १५ जानेवारीला मतदान होणार आहे तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कल्याण डोंबिवलीत (Maharashtra Politics) काँग्रेस पक्षाला एकामागोमाग एक मोठे धक्के बसत आहेत. माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच काँग्रेसचे माजी ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
राजीनामा देताना काय म्हणाले विमल ठक्कर?
विमल ठक्कर यांनी दहा ते बारा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विकासाच्या दृष्टीने आणि लोकहितासाठी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे ठक्कर यांनी स्पष्ट केले आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या गतिमान व विकासाभिमुख कामकाजामुळे प्रभावित होऊन हा निर्णय घेतल्याचे विमल ठक्कर म्हणाले.
गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे. केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. कल्याण–डोंबिवलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता यामुळे अधिकच बळावली आहे.
प्रज्ञा सातव देखील सोडणार काँग्रेसची साथ
काँग्रेसचे स्वर्गीय नेते माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. उद्या १८ डिसेंबर रोजी त्या आपल्या हाती कमळ घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.





