सोलापूर : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर राजकीय रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा सोलापूर शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यानंतर शाब्दी हे राज्यातील पक्षाचे दुसरे सर्वांत मोठे नेते मानले जातात. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा राजीनामा पक्षासाठी मोठे खिंडार मानला जात आहे. अंतर्गत राजकारणामुळे राजीनामा फारूक शाब्दी यांच्याकडे सोलापूर शहराध्यक्ष, मुंबई शहराध्यक्ष आणि प्रदेश कार्याध्यक्ष अशी महत्त्वाची पदे होती. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोनदा निवडणूक लढवली असून, दोन्ही वेळा ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. पक्षांतर्गत सुरू असलेल्या अंतर्गत राजकारण आणि वादामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महापालिका निवडणुकीच्या तयारीचा जोर असतानाच हा प्रकार घडल्याने MIMच्या राज्यातील रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सोलापुरात काँग्रेसला धक्का दुसरीकडे, सोलापूर महापालिका निवडणुकीत MIM ने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसने नुकतीच महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत प्रभाग क्रमांक १६ मधून अधिकृत उमेदवारी मिळालेल्या माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनीच काँग्रेस सोडून MIM मध्ये प्रवेश केला आहे. विशेष बाब म्हणजे, फिरदोस पटेल यांनी फारूक शाब्दी यांच्या उपस्थितीतच MIM मध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर लगेच शाब्दी यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने सोलापूरमधील MIM ची अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. महायुतीत पक्षांतराला वेग; भाजपमध्ये जोरदार इनकमिंग महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरात पक्षांतरालाही वेग आला आहे. विशेषतः महायुतीमध्ये विविध पक्षांतील नेते-कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपमध्ये जोरदार ‘इनकमिंग’ सुरू असल्याने पक्षातील जुन्या निष्ठावंतांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर याचा परिणाम दिसून येत आहे. राज्यातील प्रमुख महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, निकाल १६ जानेवारीला जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर MIM मधील घडामोडी आणि पक्षांतराच्या घटनांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.