मुंबई : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे (नाको) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील आढाव्यात काळजी आधार आणि उपचार सेवा प्रदान करण्यासाठी देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र राज्यास सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला(एमसॅक) विजयवाडा येथे आयोजित केलेल्या केंद्रीय समारंभात हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाकोच्या कामगिरी निर्देशांकानुसार ग्रीन झोनमध्ये सर्वाधिक अँटी-रेट्रोव्हायरल उपचार केंद्रे असल्यामुळे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने आपले अव्वल स्थान मिळविले आहे. या केंद्रांनी अनेक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामध्ये नोंदणीकृत सर्व एचआयव्ही – पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी सर्वसमावेशक थेरपी उपचार सुनिश्चित करणे. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आधार या गोष्टींचा समावेश आहे.