Devendra Fadnavis – सभागृहात जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता. त्या संदर्भात अजित पवार आणि एकनाथ शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे. कृषी खाते हे दत्ता भरणे यांना देण्यात आले आहे. आता मंत्रिमंडळात दुसरा कुठलाही बदल करण्यातबाबत चर्चा नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केले तसेच ते विधानसभेत ऑनलाइन रमी खेळतानाची चित्रफित प्रसारित झाली. त्यानंतर त्यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होणार अशी चर्चा होती. परंतु त्यांचे कृषी खाते बदलून युवक कल्याण व क्रीडा मंत्री बनवण्यात आले. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता ते, म्हणाले की, काही मंत्री त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि वागणुकीमुळे चर्चेत आहे. त्यांना आम्ही समज दिली आहे. बेशिस्त वर्तणूक खपवून घेतली जणार नाही. जनतेची सेवा करण्यासाठी सत्तेत आलो आहोत. जनतेची सेवा करताना आपण काय बोलतो, जनसामान्यांशी कसे बोलतो, हे सर्व जनता बघत असते. त्यामुळे अशांवर अंकुश असणे आवश्यक आहे, असे सर्व मंत्र्यांना सांगण्यात आले असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.