पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “केसरी’चे माजी संपादक, साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या स्मरणार्थ केसरी-मराठा संस्थेच्या वतीने दिल्या जाणार्या केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिकासाठी यंदा ज्येष्ठ लेखक आणि पर्यावरण अभ्यासक संतोष शिंत्रे यांच्या “पैस पर्यावरणसंवादाचा’ या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. यावेळी केसरी-मराठा संस्थेच्या वतीने वैभव पुरंदरे यांच्या “टिळक : द एम्पायरीज बिगेस्ट एनिमी’ या इंग्रजी पुस्तकाला विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पाच हजार रूपये, सन्मानपत्र असे केळकर पारितोषिकाचे स्वरूप आहे. “केसरी’चे विश्वस्त-संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी शुक्रवारी या पारितोषिकाची घोषणा केली. येत्या १४ ऑक्टोबर रोजी न. चिं. केळकर यांची ७७ वी पुण्यतिथी आहे. त्या दिवशी दुपारी चार वाजता टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुकुंदनगर येथील संकुलात पुरस्कार वितरण सोहळा होईल.