संसदेत चमकला महाराष्ट्र! ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ मध्ये ‘या’ 7 खासदारांनी मारली बाजी

Sansad Ratna Award 2025 : लोकसभेत उत्कृष्ट कामगिरीसाठी संसदरत्न पुरस्कार २०२५ जाहीर झाला असून, यंदा १७ खासदार आणि दोन संसदीय स्थायी समित्यांचा सन्मान करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सात खासदारांनी या यादीत स्थान मिळवून राज्याचा गौरव वाढवला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे, शिवसेना (ठाकरे गट) नेते अरविंद सावंत, शिवसेनेचे श्रीरंग अप्पा बारणे आणि नरेश म्हस्के, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, भाजपाच्या स्मिता उदय वाघ आणि मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे.
पुरस्काराचे स्वरूप आणि विजेते –
लोकसभेत सातत्यपूर्ण आणि प्रभावी योगदान देणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा १६व्या आणि १७व्या लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये सुप्रिया सुळे, श्रीरंग अप्पा बारणे, भर्तृहरी महताब (भाजपा, ओडिशा) आणि एन. के. प्रेमचंद्रन (क्रांतिकारी समाजवादी पक्ष, केरळ) यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपाचे रवी किशन, निशिकांत दुबे, प्रवीण पटेल, विद्युत बरन महातो, पी. पी. चौधरी, मदन राठोड आणि दिलीप सैकिया तसेच द्रमुकचे सी. एन. अण्णादुराई यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
संसदीय समित्यांचाही गौरव –
खासदारांबरोबरच दोन संसदीय स्थायी समित्यांचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालील वित्तविषयक स्थायी समिती आणि डॉ. चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) यांच्या नेतृत्वाखालील कृषीविषयक स्थायी समितीने सादर केलेल्या अहवालांच्या गुणवत्तेमुळे त्यांना हा सन्मान मिळाला.
संसदरत्न पुरस्काराची पार्श्वभूमी –
संसदरत्न पुरस्काराची सुरुवात २०१० मध्ये प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रीसेन्स यांच्या पुढाकाराने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार झाली. हा पुरस्कार खासदारांच्या संसदेतील प्रश्न, चर्चा, खासगी विधेयके आणि उपस्थिती यासारख्या कामगिरीच्या निकषांवर आधारित दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार समारंभ जुलै २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्राचे वर्चस्व –
महाराष्ट्रातील सात खासदारांना हा पुरस्कार मिळणे हे राज्याच्या राजकीय नेतृत्वाचे यश मानले जात आहे. सुप्रिया सुळे यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करताना जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवण्याचे आपले ध्येय कायम ठेवणार असल्याचे सांगितले. पुण्यातील मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही या पुरस्काराचे श्रेय जनतेच्या प्रेमाला दिले.
पुरस्काराचे महत्त्व –
संसदरत्न पुरस्कार हा खासदारांचे संसदेतील योगदान आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना मांडण्यातील त्यांचा धडाकेबाजपणा यांचा गौरव करतो. खासदारांनी उपस्थित केलेले प्रश्न, चर्चा आणि विधेयके यामुळे सरकारला धारेवर धरण्याचे महत्त्वाचे काम या खासदारांनी केले आहे. या पुरस्काराने केवळ खासदारांचेच नव्हे तर संसदेच्या प्रभावी समित्यांचेही योगदान अधोरेखित झाले आहे.





