मंचर, (पुणे) : राज्यात मतचोरी विरोधात मुंबईत ऐल्गार सभा रंगत असतानाच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकां निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर करत त्यांनी कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ते मंचर येथे युवक – युवती मेळाव्यात बोलत होते. दिलीप वळसे पाटील म्हणाले, मी तारीख जाहीर करत नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे, असं म्हणत आमच्याकडील माहितीनुसार 5 नोव्हेंबर ला नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक जाहिर होतील, तर 15 डिसेंबरला जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदान होईल. तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणूका सुरु असताना महानगरपालिकांच्या निवडणूका जाहिर होऊन 15 जानेवारीला मतदान होईल आणि 31 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील, असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, निवडणूकांचे वेळापत्रकच जाहीर केल्यामुळे राजकारण तापणार का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.