Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : दोन शिक्षक मतदारसंघांत महायुती तर पदवीधरच्या जागांवर मविआचा विजय; तब्बल 45 तासांनंतर सर्व निकाल स्पष्ट
Maharashtra Legislative Council Results 2026: विजयी उमेदवारांची नावे...

Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी (दि. २७) मतमोजणीस सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी पसंतीक्रमानुसार मतदान होत असल्याने मतमोजणीस उशीर होतो. रात्री उशिरापर्यंत मतमाेजणी सुरू होती. त्यानुसार आता जवळपास 45 तासांनी विधान परिषदेच्या 5 जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख- जाधव विजयी झाल्या आहेत, तर शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे हे विजयी झाले आहेत.
याशिवाय अमरावती शिक्षक निवडणुकीत शिवसेनेच्या किरण सरनाईकांचा विजय झाला आहे. तर नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी बाजी मारली. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतापसिंग पाटील यांनी विजय मिळवला आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ- अभिजीत वंजारी (काँग्रेस)
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांनी भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना पराभवाचा धक्का दिला. तर अपक्ष नितेश कराळे गुरुजी यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची वंजारी यांना साथ मिळाली, यामुळे भाजपची रणनीती नागपूरमध्ये अपयशी ठरली.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ- हर्षदा जाधव-देशमुख (शरद पवार गट)
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळविला. हर्षदा देशमुख-जाधव यांना १ लाख १३ हजार ८४० मते मिळाली, तर स्मिता जाधव यांना १ लाख ३ हजार ९१२ मतांवर समाधान मानावे लागले. ४४ व्या बाद फेरीत विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करत हर्षदा यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्मिता जाधव यांचा ९ हजार ९२८ मतांनी पराभव केला.
छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ- डॉ. प्रतापसिंह पाटील (शरद पवार गट)
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी बाजी मारली. विद्यमान आमदार अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांच्या १८ वर्षांपासूनच्या मतदारसंघावरील वर्चस्वाला धक्का बसला आहे. तब्बल १३,२०७ मतांची आघाडी घेत पाटील यांनी विजय मिळवला.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ- किरण सरनाईक (शिंदेसेना)
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये शिंदेसेनेचे किरण सरनाईक यांनी महाविकास आघाडीच्या प्रा. अदिती पोहरे यांचा पराभव केला. पहिल्या पसंतीच्या फेरीपासून सरनाईक यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी १६,६६३ मते मिळवित विजय मिळवला.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ -कौस्तुभ गावडे (भाजप)
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांनी १८ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा भाजपचा झेंडा फडकविला. विशेष म्हणजे आजवर निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये 30 वर्षीय गावडे हे सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत.
गावडे यांनी शिवसेनेचे उमेदवार सानप यांचा तब्बल ६ हजार ७७० मतांनी पराभव केला. एकूण वैध मतांमधून २५ हजार ७५६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. त्यात गावडे यांना निर्धारित मते न मिळाल्याने २७ बाद फेऱ्यांनतर २३ हजार १७७ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सानप यांना १६ हजार ३४७ मते मिळाली. तर विद्यमान आमदार काँग्रेसचे जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर राहिले.
हेही वाचा:
Maval News: मावळचा इंद्रायणी महागणार! अपुऱ्या पावसाने भातपिकाच्या उत्पादनात घट





