Maval News: मावळचा इंद्रायणी महागणार! अपुऱ्या पावसाने भातपिकाच्या उत्पादनात घट
Maval News: तांदळाचे दर ९० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता!

पवनानगर – मावळ तालुक्याची ओळख असलेल्या इंद्रायणी तांदळाच्या दरात आगामी काळात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा पावसाने लवकर उघडीप दिल्याने आणि भात पीक निसवण्याच्या व दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील सुमारे ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांच्या भात पिकाला फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, याचा परिणाम यंदाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.
सध्या इंद्रायणी तांदळाचा दर प्रतिकिलो सुमारे ७० ते ७५ रुपये असल्याचे सांगितले जात आहे. भात उत्पादनात घट होऊन बाजारातील आवक कमी राहिल्यास तांदळाचे दर प्रतिकिलो ८५ ते ९० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मावळच्या इंद्रायणी तांदळाच्या दरवाढीकडे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
मात्र, प्रत्यक्ष दरवाढ किती होणार, हे बाजारातील मागणी, उपलब्ध साठा आणि तांदळाच्या गुणवत्तेवर अवलंबून राहणार आहे. चालू खरीप हंगामात सुरुवातीला भात लागवडीसाठी पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दीर्घ खंड दिल्याने भात पिकाला निसवण्याच्या आणि ओंब्या भरण्याच्या काळात पुरेसे पाणी मिळाले नाही.
परिणामी, अनेक ठिकाणी भाताच्या ओंब्या पूर्णपणे भरल्या नसून दाण्यांची वाढही अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. काही शेतांमध्ये पीक पळींज झाल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध होती, त्यांच्या पिकांची स्थिती तुलनेने चांगली असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र, एकूण उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आधीच नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार ?
उत्पादन कमी झाल्यास बाजारातील आवक घटू शकते आणि त्यातून इंद्रायणी तांदळाच्या दरावर परिणाम होऊ शकतो. मात्र, दरवाढ झाली तरी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याचा कितपत फायदा मिळेल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
दुसरीकडे, तांदळाचे दर वाढल्यास ग्राहकांच्या खिशालाही अधिकचा भार सहन करावा लागणार आहे. यंदाचे प्रत्यक्ष भात उत्पादन, बाजारातील आवक आणि मागणी यावर इंद्रायणी तांदळाच्या दरांची पुढील दिशा ठरणार आहे. मावळच्या प्रसिद्ध इंद्रायणी तांदळाचे दर ९० रुपयांपर्यंत जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘खरीप हंगामात पावसाने खंड दिल्याने इंद्रायणी भाताला ओब्या भरण्याच्या काळात पाणी न मिळाल्याने भाताचे दाणे भरू शकले नाहीत सर्व भात पळींज झाले आहे. त्यामुळे माझे दीड एकर भात क्षेत्राचे नुकसान झाले असून यावर्षी भात उत्पादन खूप कमी होणार आहे.’ – रघुनाथ ओव्हाळ, शेतकरी शिळींब.
Nevasa : अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद! चौदा तालुके दुष्काळग्रस्त





