Legislative Council Election : विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान; 182 उमेदवार रिंगणात
Legislative Council Election : २ हजार ४१९ मतदान केंद्रांवर १० लाख ६८ हजारांहून अधिक मतदार बजावणार हक्क; २७ ऑक्टोबरला मतमोजणी

Legislative Council Election : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यासाठी २ हजार ४१९ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, १० लाख ६८ हजार ७२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
छ. संभाजीनगर, पुणे आणि नागपूर विभागातील पदवीधर तसेच अमरावती आणि पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघांचा यात समावेश आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ४७ उमेदवार आहेत. त्यानंतर छ. संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात ४१, नागपूर पदवीधर मतदारसंघात ३८, पुणे शिक्षक मतदारसंघात ३० आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात २६ उमेदवार आहेत.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख ८८ हजार १९ मतदार आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात सर्वात कमी ३५ हजार ८१० मतदार आहेत. मतदानासाठी छ. संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात ८४२, पुणे पदवीधरमध्ये ७४१, नागपूर पदवीधरमध्ये ४४५, अमरावती शिक्षकमध्ये ८१ आणि पुणे शिक्षक मतदारसंघात ३१० मतदान केंद्रे आहेत.
पाचही विद्यमान सदस्यांची मुदत ६ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून, ३१ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.





