Maharashtra growth rate: विकासदरात महाराष्ट्र पडला मागे; कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू पुढे
Maharashtra growth rate: 2024-25 च्या मूल्यांकनानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वात मोठी म्हणजे 42.67 लाख कोटी रुपयांची आहे. 2021-22 ते 2024-25 या आर्थिक वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र सरकारचे सकल राज्य उत्पन्न 43 टक्क्यांनी वाढले. मात्र कर्नाटक, गुजरात, तामिळनाडूचे उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त वेगाने वाढले आहे.

Maharashtra growth rate: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतर कोणत्याही राज्यापेक्षा मोठी असली तरी गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्राचा उत्पन्न वाढीचा दर इतर तीन मोठ्या राज्यापेक्षा पिछाडीवर राहिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. करोनानंतर महाराष्ट्राच्या विकासाचा वेग बराच मंदावला असल्याची आकडेवारी सरकारकडून जाहीर करण्यात आली.
2024-25 च्या मूल्यांकनानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वात मोठी म्हणजे 42.67 लाख कोटी रुपयांची आहे. 2021-22 ते 2024-25 या आर्थिक वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र सरकारचे सकल राज्य उत्पन्न 43 टक्क्यांनी वाढले. मात्र कर्नाटक, गुजरात, तामिळनाडूचे उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त वेगाने वाढले आहे. या कालावधीत कर्नाटकचे उत्पन्न सर्वात जास्त म्हणजे 65 टक्क्यांनी वाढले. कर्नाटकचा विकास दर महाराष्ट्रापेक्षा 20 टक्क्यांनी जास्त वाढला आहे. कर्नाटक राज्याचे सकल उत्पन्न 2021-22 मध्ये 17.02 लाख कोटी रुपये होते ते 2024-25 मध्ये 28.09 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगलोरमध्ये माहिती तंत्रज्ञान सेवा इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त प्रमाणात विकसित झाल्यामुळे कर्नाटकच्या विकासाचा दर जास्त राहिला आहे. 2021-22 मध्ये गुजरातचे उत्पन्न 18.79 लाख कोटी रुपये होते. 2024-25 मध्ये हे उत्पन्न 27.90 लाख कोटी रुपये झाले आहे. गुजरातचा विकास दर या कालावधीत 48 टक्क्यांनी वाढला आहे.
वेगवान विकासात तामिळनाडू महाराष्ट्राच्या पुढे आहे. या राज्याचा विकास दर 2021-22 ते 2024- 25 या कालावधीत 47% इतका राहिला आहे. या कालावधीत गुजरातचे उत्पन्न 21.36 लाख कोटी रुपयावरून 31.55 लाख कोटी रुपयांवर गेले. कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांचा या कालावधीत विकासदर महाराष्ट्रापेक्षा जास्त असला तरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या सर्व राज्यापेक्षा कितीतरी मोठी आहे.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तामिळनाडूपेक्षा 11 लाख कोटी रुपयांनी, गुजरातपेक्षा 14 लाख कोटी रुपयांनी, तर कर्नाटक पेक्षा 15 लाख कोटी रुपयांनी मोठी आहे. असे असले तरी महाराष्ट्र जर गाफील राहिला तर आगामी काळात ही राज्य महाराष्ट्राला पिछाडीवर टाकू शकतात. त्यामुळे महाराष्ट्राने आगामी काळात अंग झटकून काम करण्याची गरज आहे. विविध क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी इतर राज्य महाराष्ट्रापेक्षा अधिक परिणामकारकपणे प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.





