SSC HSC Exam : कॉपी बहाद्दरांना घडणार अद्दल ! 10 वी,12 वीच्या परीक्षेबाबत बोर्डाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरु असताना बोर्डाने दहावी- बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. यानंतर विद्यार्थी आणि बोर्ड दोघेही कामाला लागले आहेत. परीक्षा म्हंटली कि कॉपीचे प्रकार आले. याच कॉपीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी बोर्डानं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बोर्डाने सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला आहे.
का घेतला निर्णय?
दहावी, बारावी बोर्ड परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी राज्य मंडळाकडून घेतली जात आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान मोबाईलद्वारे किंवा अन्य माध्यमातून पेपरफुटी रोखण्यासाठी विविध पर्याय अवलंबले जात आहेत.
त्यामुळे वर्गातील गैरप्रकार रोखण्यासाठी दहावी-बारावीच्या परीक्षेचे आता सीसीटीव्हीत रेकॉर्डिंग होणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्ड प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असणार आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात असणारे सगळे फुटेज देखील प्रशासनाकडे द्यावे लागणार आहे.
आदेशात काय म्हंटले?
केंद्रावरील गैरप्रकाराची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बोर्डाकडून त्याची पडताळणी होईल आणि त्यानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. बोर्ड परीक्षेच्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा बंधनकारक करण्यात आले आहेत. नुसतेच सीसीटीव्ही कॅमेरे असून चालणार नाही, तर त्याचे फुटेज साठवून ठेवण्याचीही सोय आवश्यक आहे. परीक्षा संपून निकाल लागेपर्यंत ते फुटेज संबंधित केंद्र चालकांना जतन करून ठेवावे लागणार आहे.





