‘छगन भुजबळ नाराज नाही, तर त्यांच्या मनात तिकीट न मिळाल्याने अपमान झाल्याची भावना..’

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती. मात्र सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली. यापूर्वी ते नाशिक लोकसभा निवडणूक लढण्यासाठी देखील इच्छुक होते. मात्र त्यांनी माघार घेतली. यामुळे छगन भुजबळ हे नाराज असून ते घरवापसी करणार अशी चर्चा सुरू झाली.
यावर आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यसभेच्या जागेवरून छगन भुजबळ नाराज नाहीत. लोकसभा निवडणुकीत नाव पुढे येऊनही तिकीट न मिळाल्याने अपमान झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. त्यामुळेच त्यांनी खदखद बोलून दाखवली.’अशी मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हसन मुश्रीफ यांनी पुढे सांगितले की,’नुकतीच माझी छगन भुजबळ यांच्याशी या सर्व मुद्द्यांवरून चर्चा झाली. ते नाराज नाही. त्यांनी राज्यसभेची उमेदवारी मागितली होती. पण आम्ही त्यांना समजावलं. तुम्हाला राज्यात राहण्याची आवश्यकता आहे, असं आम्ही सर्वांनी त्यांना सांगितलं होतं. आपला जो नवीन पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य पक्ष म्हणून उदयाला आला आहे. सर्व जबाबदारी तुमच्यावर आहे. ओबीसींचे नेते म्हणून तुम्ही चांगले काम करत आहात. त्यामुळे तुम्हाला राज्यात राहायचं आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदही तुमच्याकडे आहे, अशा भावना आम्ही व्यक्त केल्या. आमचं म्हणणं ऐकल्यावर ते खूश होते.’





