महायुती सरकारकडून महाराष्ट्रावर गेल्या दोन वर्षांत सातत्याने अन्याय; माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची टीका

वरळी : महाराष्ट्रातील परिस्थिती हरियाणा व जम्मू-काश्मीरपेक्षा खूप वेगळी आहे. महाराष्ट्रात मविआचा विजय होणार आहे. कारण येथील समस्या वेगळ्या आहेत. मोदी सरकारकडून, महायुती सरकारकडून महाराष्ट्रावर गेल्या दोन वर्षांत सातत्याने अन्याय झाला आहे. महाराष्ट्र या गोष्टींचा विचार करून मतदान करेल, असे म्हणत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, भाजप व आरएसएसमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. जर नड्डा म्हणत असतील की त्यांना आरएसएसची आता गरज नाही, तर मग मला आरएसएसला प्रश्न विचारायचा आहे की गेल्या दोन वर्षांत त्यांना काय मिळाले? त्यांनी याचा विचार केला असे मला वाटत नाही, असे ते म्हणाले.
तसेच भाजपचे महाराष्ट्रातील टॉप ५ चेहरे कोण आहेत? २०१९ ला ज्यांच्यावर भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप होत होते, ते आता भाजपचे अग्रणी चेहरे म्हणून दिसत आहेत. गेल्या दोन वर्षांत तुम्ही पाहिल्यास विधानसभेचे अध्यक्ष २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात केलेले होते, त्याआधी ते शिवसेनेत होते. ते मूळ भाजपचे नाहीत. अवैध मुख्यमंत्री शिवसेनेकडून घेतले आहेत. त्यांचे १० मंत्री शिवसेनेकडून घेतले आहेत, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.





