Maharashtra Freedom of Religion Bill : महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू! आंतरधर्मीय विवाह केल्यास अपत्यासाठी असणार ‘हा’ नियम
Maharashtra Freedom of Religion Bill : ७ वर्षांपर्यंत कठोर कारावासाची शिक्षा

Maharashtra Freedom of Religion Bill: राज्य सरकारने तयार केलेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाली आहे. यानंतर आता महाराष्ट्रात हा कायदा लागू होणार आहे.
हा कायदा विधिमंडळाने मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केला होता आणि त्यानंतर तो मंजुरीसाठी राज्यपाल व नंतर राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला होता. विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी), समाजवादी पक्ष आणि सीपीआय (एम) यांनी या विधेयकाला विरोध केला होता, मात्र शिवसेना (यूबीटी) ने त्याला पाठिंबा दिला होता.
या नव्या कायद्यानुसार, राज्यात कोणत्याही व्यक्तीचे बळजबरीने, धमकावून, फसवून किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे. या कायद्यामुळे राज्यात बळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्यांविरोधात अत्यंत कठोर कारवाई केली जाणार आहे.
७ वर्षांपर्यंत कठोर कारावासाची शिक्षा
या कायद्यातील तरतुदींनुसार, दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला ७ वर्षांपर्यंतच्या कठोर कारावासाची शिक्षा होणार आहे. तर पुन्हा गुन्हा करणाऱ्यांसाठी ही शिक्षा 10 वर्षांपर्यंत वाढू शकते. तसेच एक लाख रुपयांच्या आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यामुळे बेकायदेशीर आणि सक्तीच्या धर्मांतरणाला आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच धर्मांतरित व्यक्तीचे पालक आणि इतर नातेवाईक यांना तक्रार करण्याचा अधिकार असणार आहे.
धर्मांतरापूर्वी 60 दिवस आधी सूचना देणे अनिवार्य
स्वखुशीने धर्मांतर करण्यापूर्वी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना 60 दिवस आधी सूचना देणे अनिवार्य असणार आहे. याबाबत सक्षम प्राधिकरणाकडे लेखी अर्ज सादर करावा लागणार आहे. प्राधिकरणाकडून कायदेशीर पडताळणी आणि मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित व्यक्तीला धर्मांतर करता येईल.
अपत्याला आईचा विवाहापूर्वीचा धर्म लागू होणार
विशेष म्हणजे आंतरधर्मीय विवाह झाल्यास त्या दाम्पत्याच्या अपत्याला आईचा विवाहापूर्वीचा धर्म लागू होणार आहे. राज्यात गेल्या काही काळापासून सक्तीच्या धर्मांतराच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर हा कायदा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अनेकांकडून या नव्या कायद्याचे स्वागत केले जात आहे. तर काहींकडून विरोधही होत आहे.
हेही वाचा:
Iran threat to America: “जर तुम्ही आता हल्ला केलात, तर आम्ही तुम्हाला…”; इराणची अमेरिकेला धमकी





