Nitesh Rane : ‘संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्यांची लायकी नाही’; नितेश राणेंचा जोरदार पलटवार
Nitesh Rane : तसेच संजय राऊत यांनी मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन सुसंस्कृतपणाचे सल्ले द्यावेत, असेही नितेश राणे म्हणाले.

Nitesh Rane : उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली होती. या टीकेचा खरपूस समचार भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. “संजय राऊत ४२० आहे हे आम्हाला म्हणावं लागेल. पत्रा चाळप्रकरणी जो जेलमध्ये जाऊन आलाय तो 420 च आहे. आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही.” अशा शब्दांत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर पलटवार केला.
१ अॅागस्ट या दिवशी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विशेष उपस्थिती लाभली होती. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
हा पुरस्कार अमित शाह यांच्या हस्ते अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. यावरुन अमित शाह यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती.”तुम्ही मुळचे गुंड आहात, एकतर गुंडासारखे वागा नाहीतर गृहमंत्र्यांसारखे वागा,” असं संजय राऊत म्हणाले होते.
देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये
या टीकेचा समाचार घेताना नितेश राणे यांनी संजय राऊतांवर बोचरा वार केला. “संजय राऊत ४२० आहे हे आम्हाला म्हणावं लागेल. पत्रा चाळप्रकरणी जो जेलमध्ये जाऊन आलाय तो ४२० च आहे. आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही. खिचडीमध्ये पैसे खाणाऱ्या ४२० ने आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये.” असा थेट इशारा नितेश राणेंनी दिला. तसेच संजय राऊत यांनी मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन सुसंस्कृतपणाचे सल्ले द्यावेत, असेही नितेश राणे म्हणाले.
पंतप्रधानांनी एक आदर्श घालून दिलाय, मला त्यांचा अभिमान वाटतो
गेल्या काही दिवसांत अनेकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इंन्स्टाग्रामवर लाइव्ह आले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तरुणांसोबत संवाद साधला. या व्हिडिओवर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले “हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठेपणा आहे. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेणं म्हणजे भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपल्या देशाचं नेतृत्व अशा जबाबदार आणि सुसंस्कृत माणसाकडे आहे. मोदी आणि त्यांच्या आईवर टीका केली तरी त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवलाय, हे क्वचितच असेल. पंतप्रधानांनी एक आदर्श घालून दिलाय, मला त्यांचा अभिमान वाटतो.”






