Maharashtra Election 2024 : मनसेचा दीपोत्सव म्हणजे आचारसंहितेचा भंग, ठाकरे गटानं तक्रारीसह केली ‘ही’ मागणी….

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दीपोत्सवाला नियमबाह्य परवानगी देत आचारसंहिता भंग करण्यात आल्याची तक्रार शिवसेना ठाकरे गटाचे सचिव अनिल देसाई यांनी केली आहे. तसेच या कार्यक्रमाला महिम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अमित ठाकरे उपस्थित असल्याने या कार्यक्रमाचा खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात ग्राह्य धरण्यात यावा, अशी देखील मागणी देसाई यांनी केली आहे.
मनसेच्या या दीपोत्सवाची तक्रार अनिल देसाई यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे केली आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क येथे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा केला. याला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगीच्या विरोधात देखील अनिल देसाई यांनी तक्रार दाखल केली आहे.
खासदार देसाई यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेत मनसेच्या या दीपोत्सवाप्रकरणी निवेदन देत तक्रार दाखल केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात माहीम विधानसभेचे मनसे पक्षाचे अधिकृत उमेदवार अमित राज ठाकरे हे उपस्थित होते, त्यामुळे सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.





