Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड सुरु

बेळगाव : बेळगावमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा संघर्ष सुरू झाला आहे. कर्नाटक सरकारचे बेळगावमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी याच धर्तीवर बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केलेले असताना कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारली.
तसेच सोमवारी सकाळपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड केली. यामुळे बेळगावामधील वातावरण तापले आहे. दरम्यान, बेळगावमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांनाही प्रवेशबंदी लागू केली आहे. बेळगावमध्ये सोमवारी सकाळपासून तणावग्रस्त वातावरण होते. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच असल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेत नजरकैदेत ठेवले. या महामेळाव्यासाठी कोल्हापूरमधून ठाकरेसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जाणार असल्याने कर्नाटक पोलिसांकडून कोल्हापूरच्या ठाकरेसेनेचे नेते विजय दवणे यांच्यासह प्रमुख नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली असून, तशा नोटीसा देखील बजावण्यात आल्या.
सोमवारी समितीचे कार्यकर्ते आणि नेते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी जात असतानाच तिथं कर्नाटक पोलिसांच्या तुकडीने या नेत्यांना रोखले. यावेळी आम्हाला अभिवादन करत हार अर्पण करण्यासाठी जाऊ द्या, अशी विनंती करूनही पोलिसांनी या विनवणीला न जुमानताच त्यांना ताब्यात घेतले.





