Maharashtra Din 2023 : ‘महाराष्ट्र दिन’ का साजरा केला जातो?, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व…

मुंबई – मराठी माणसांसाठी आजचा दिवस म्हणजे ‘महाराष्ट्र दिन’ हा खुप जीव्हाळ्याचा आणि आनंदाचा दिवस म्हणून ओळखला जातो. कारण आजच्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली आहे. मराठी लोक आपल्या जन्मभूमीचा आदर करतात आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा अभिमान देखील बाळगतात. केंद्राने संसदेत महाराष्ट्राच्या मागणीचा ठराव संमत करून 1960 साली मराठी लोकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. मात्र अनेकांना माहिती नसेल, आजच्या दिवशीच ‘महाराष्ट्र दिन’ का साजरा केला जातो? यामागाचा नेमका इतिहास काय आहे? चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचे महत्त्व…
15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र अद्यापही स्वतंत्र नव्हता. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. जेव्हा इंग्रजांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशाची प्रादेशिक घटना खूप वेगळी होती. शेकडो राज्ये एकवटली गेली आणि देशाच्या कारभारासाठी राज्य व्यवस्था स्थापन करावी लागली.
1956 मध्ये, राज्य पुनर्गठन अधिनियमाने भाषेच्या आधारे भारतातील राज्यांच्या मर्यादा निश्चित केल्या. आज बरीच नवीन राज्ये आपल्या परिचयाची आहेत, पण त्यामध्ये मराठी, गुजराती, कच्छी आणि कोंकणी अशा भाषिक गटांचा समावेश असलेल्या मुंबई राज्यासारख्या विसंगती निर्माण झाल्या.
दरम्यान, या मतभेदांमुळे बॉम्बे स्टेटला दोन राज्यांत विभागण्यासाठी एक चळवळ उभी राहिली, एक म्हणजे जेथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरे जेथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोंकणी बोलतात. त्याच वेळी मराठी भाषिक नागरिक स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली.
तसेच महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये 25 एप्रिल 1960 रोजी संसदेतर्फे लागू करण्यात आलेल्या बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960 नुसार अस्तित्वात आली. हा कायदा 1 मे 1960 रोजी अमलात आला. याच बॉम्बे पुनर्गठन अधिनियमांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात हे राज्ये विभागले गेले आणि दोन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली.





