Maharashtra Government Formation : राज्य सरकारच्या शपथविधीसाठी पोलिसांचा ‘असा’ असेल बंदोबस्त!

मुंबई : राज्यात स्थापन होणाऱ्या नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी आझाद मैदानावर पार पडणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीसांची आजच विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे ते उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे तसेच त्यांच्याबरोबर दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची चर्चा आहे.
या शपथविधी सोहळ्याला अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने आझाद मैदान व आसपासच्या परिसरात जोरदार तयारी सुरू आहे. शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाच्या परिसराभोवती व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी किमान पाच अतिरिक्त पोलिस आयुक्त, १५ पोलिस उपायुक्त आणि २९ सहायक पोलिस आयुक्त तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय ५२० पोलीस अधिकारी आणि साडेतीन हजार कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.
सोहळ्यादरम्यान वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, तीन पोलीस उपायुक्त, ३० पोलीस अधिकारी आणि २५० इतर कर्मचारी यांचा समावेश असलेली टीम नियुक्त केली जाईल.
वाहतुकीत करण्यात येणार बदल
शपथविधीच्या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार महानगरपालिका मार्ग:- छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सीएसएमटी जंक्शन ) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) दरम्यान दोन्ही वाहिन्या बंद ठेवण्यात येतील. तेथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी एल. टी. मार्ग, चकाला जंक्शनवरून उजवे वळण – डी. एन. रोड छत्रपती शिवाजी महाराज – जंक्शन (सीएसएमटी जंक्शन) या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





