Maharashtra Cabinet : फडणवीस 3.0 मधून ज्येष्ठांना विश्रांती; मुनगंटीवार, भुजबळ, सत्तार, तानाजी सावतांना वगळले

Maharashtra Cabinet – महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज (रविवार) नागपूरमध्ये पार पडला. देवेंद्र फडणवीस यांच्या तिस–या कार्यकाळात महायुतीमधील सर्व पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारातून वगळण्यात आले आहे. यामध्ये भाजपमधून सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, शिवसेनेतून अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांना वगळण्यात आले आहे.
माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचे नाव आजच्या मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याच्या यादीत नव्हते. त्यांना पक्षसंघटनेत मोठी जबादारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. त्यामुळे ते प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता आहे, या पदावर चव्हाणांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र तिथे त्यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला. विधानसभेत ते पुन्हा निवडून आले, मात्र आता त्यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालेले नाही. वनमंत्री म्हणून ते शिंदे सरकारमध्ये होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नावावरही फुली मारण्यात आली आहे. वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यामुळेच भुजबळांना वगळण्यात आले का, हे अजून स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, मनोज जरांगे यांच्यासोबतच्या वादाचा त्यांना फटका बसला का, याचीही चर्चा सुरु आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर त्यांना भक्कम साध देणारे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचे नाव संभाव्य मंत्र्यांच्या यादीतून कमी करण्यात आले. याशिवाय माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनाही डच्चू देण्यात आला आहे. या तीन नेत्यांची फडणवीसांच्या मंत्रिमंळात स्थान देण्यात आलेले नाही.





