अर्थसंकल्पात मोठी घोषणा, मुंबईतील ‘या’ 7 ठिकाणी उभारली जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे

Maharashtra Budget 2025 | अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने रोजगार निर्मिती व पायाभूत सुविधांसाठी मोठी तरदूत करण्यात आली आहे. मुंबईतील व्यापार वाढीसाठी शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे उभारली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील 7 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे उभारली जाणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार – बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जातील.
मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे “ग्रोथ हब” म्हणून विकसित केले जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 140 बिलीयन डॉलरवरून सन 2030 पर्यंत 300 बिलीयन डॉलर, तर सन 2047 पर्यंत 1.5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट
यावेळी अजित पवारांनी राज्याचं नवं औद्योगिक धोरण २०२५ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याच सांगितले आहे. पाच वर्षांच्या कालावधीत ४० लाख कोटींची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असेल. यासोबत आकाश व संरक्षण क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स अँड ज्वेलरी धोरण, सूक्ष-लघू-मध्यम उपक्रम धोरण, चक्रिय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करण्यात येणार आहे. नवे कामगार नियम होणार आहेत. तसेच राज्यात ३७ विशेष आर्थिक क्षेत्रे विकसित केली जाणार असल्याचेही अजित पवारांंनी सांगितले आहे.





