Maharashtra Budget 2022: महाविकास आघाडीची ‘पंचसूत्री’; एका क्लिकवर 10 सर्वात मोठ्या बजेट घोषणा वाचा

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा 2022-23चा अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी विकासाची पंचसूत्री सादर करताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी तब्बल 1 लाख 15 हजार 215 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असल्याची माहिती दिली.
कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पाच महत्वाच्या गोष्टींवर केंद्रीत अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. यासाठी येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटी, आरोग्य क्षेत्रासाठी 5 हजार 244 कोटी रुपये, मनुष्यबळ विकासासाठी 46 हजार 667 कोटी तर पायाभूत सुविधा व वाहतूकीसाठी 28 हजार 605 कोटी तरतुद करण्यात आली आहे. तसेच उद्योग व उर्जा विभागासाठी 10 हजार 111 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पातील दहा मोठ्या घोषणा
1) भूविकास बँकेच्या 34,788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रूपयांची कर्जमाफी, बँकेच्या कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाख रूपये एवढी देणी अदा करणार.
2) 1 लाख 20 हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना ई शक्ती योजनेतून मोबाईल सेवा देणार
3) हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर ,रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करणार.
4) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरूषांशी संबंधित गावांतील 10 शाळांकरिता 10 कोटी रुपये निधी
5) फिजीओथेरपी शाखेचा वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये समावेश, नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा येथे प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारणार.
6) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 3000 नवीन बसगाड्या व 103 बसस्थानकांच्या आधुनिकीकरण यासाठी भांडवली अर्थसहाय्य.
7) शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिंनीसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्सिंग मशिन
8) छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना” सुरु करणार. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमीत्त वढु बुद्रुक व तुळापूर, ता.हवेली जि.पुणे या परिसरात स्मारकासाठी 250 कोटी रुपये निधी उपलब्ध करणार.
9) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा (Balasaheb Thackeray Mumbai Nagpur Super Communication Highway) नागपूर ते भंडारा-गोंदिया,नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार.
10) मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत रोजगाराच्या 3 लाख 30 हजार नवीन संधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 1 लाख रोजगाराच्या नव्या संधी




