Maharashtra BJP : देशभरातील 37 आणि महाराष्ट्रातील 7 राज्यसभा जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीचे सहा तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून जाण्याची शक्यता आहे. यात भाजपच्या वाट्याला चार जागा येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपची कोअर कमिटी बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री पंकजा मुंडे यांसह वरिष्ठ नेते उपस्थित होते. सुमारे 10 ते 12 संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. प्रीतम मुंडेंचं नाव चर्चेत बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना माजी खासदार प्रीतम मुंडे यांचे नावही राज्यसभेसाठी चर्चेत असल्याचे सांगितले. “राज्यसभेसाठी अनेक नावे चर्चेत असून त्यात प्रीतम मुंडेंचंही नाव आहे. अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे भाजपच्या गोटात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी तिकीट कापल्यानंतर प्रीतम मुंडेंचं पुनर्वसन राज्यसभेतून होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अन्य संभाव्य नावेही चर्चेत भाजपकडून विनोद तावडे, भागवत कराड, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, विजया रहाटकर यांसह अनेक नावांवर चर्चा झाल्याचे समजते. उमेदवार निवडताना अनुभव, पक्षनिष्ठा आणि सक्रियता या मुद्द्यांचा विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर अंतिम प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यात येणार असून केंद्रीय नेतृत्वाकडून अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये धक्कातंत्राची शक्यता वर्तवली जात आहे.