Duleep Trophy 2025 : महाराष्ट्राच्या सौरभ नवलेने रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Saurabh Nawale Become 1st Serious Injury Substitute : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदाच्या घरेलू हंगामापूर्वी एक महत्त्वाचा बदल केला. नव्या ‘गंभीर दुखापत’ नियमांतर्गत दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूला फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची परवानगी दिली आहे. याच नियमाचा वापर करत दुलीप ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्यात महाराष्ट्राच्या सौरभ नवले याला वेस्ट झोनच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे सौरभ नवले हा बीसीसीआयच्या या नव्या नियमांतर्गत पहिला सब्स्टीट्यूट खेळाडू ठरला आहे.
काय घडलं सामन्यात?
वेस्ट झोनचा सलामीवीर हार्विक देसाईला सामन्यादरम्यान मांडीला दुखापत (क्वॉड्रिसेप्स इंजरी) झाल्याने तो दुसऱ्या डावापूर्वी सामन्यातून बाहेर पडला. पहिल्या डावात हार्विकने सलामीला फलंदाजी करताना अवघी एक धाव काढली आणि यष्टिरक्षक म्हणून एक झेल टिपला. मात्र, दुसऱ्या डावापूर्वी त्यांची दुखापत गंभीर झाल्याने सामन्याच्या रेफ्री आणि मैदानी पंचांच्या संमतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. त्याच्या जागी सौरभ नवले याला संघात स्थान देण्यात आले. नवले तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला, परंतु तो ३१ चेंडूंमध्ये केवळ ९ धावा करून बाद झाला.
काय आहे ‘गंभीर दुखापत’चा नियम?
बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, सामन्यादरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत झाल्यास त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची परवानगी आहे. यापूर्वी केवळ डोक्याला दुखापत (कन्कशन) झाल्यासच अशा प्रकारच्या बदली खेळाडूला परवानगी होती. आता बीसीसीआयने हा नियम गंभीर शारीरिक दुखापतींसाठी विस्तारित केला आहे. आता संघाचे डॉक्टर, सामन्याचे रेफ्री आणि मैदानी पंच यांच्या संमतीने हा निर्णय घेतला जातो. या निर्णयामागे नुकत्याच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंत आणि क्रिस वोक्स यांच्या गंभीर दुखापतींमुळे निर्माण झालेली चर्चा कारणीभूत ठरली. या नियमामुळे राखीव खेळाडूंना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा – Duleep Trophy 2025 : रजत पाटीदारचा जलवा! आरसीबीनंतर आता सेंट्रल झोनला नेलं फायनलमध्ये
सामन्याचा निकाल –
दुलीप ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्यात सेंट्रल झोनने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर वेस्ट झोनला मागे टाकले. सामना अनिर्णित राहिला, परंतु पहिल्या डावातील आघाडीमुळे सेंट्रल झोनने अंतिम फेरीत प्रवेश केला. आता सेंट्रल झोनचा सामना साउथ झोनशी अंतिम सामन्यात होणार आहे. हा सामना ११ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.





