Health Scheme : महाराष्ट्रातील 11 लाखांहून अधिक रुग्णांना मोफत उपचार; तुमच्या कुटुंबालाही मिळू शकतो लाभ!
Health Scheme : महाराष्ट्रात आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून ११ लाखांहून अधिक रुग्णांना लाभ. प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार. आयुष्मान कार्ड कसे काढायचे ते जाणून घ्या.

Health Scheme : आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून राज्यातील कुटुंबांना वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. आतापर्यंत ४.४५ कोटी आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली आहेत.
मुंबई : आर्थिक अडचणींमुळे कोणालाही उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवल्या जात आहेत. या योजनांचा जानेवारी ते नोव्हेंबर २०२६ या काळात ११ लाखांहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. या माध्यमातून १७ लाखांहून अधिक उपचार करण्यात आले असून, त्यासाठी सरकारने २ हजार ८६९ कोटी ४५ लाख रुपये खर्च केले आहेत.
प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांपर्यंत उपचार –
महाराष्ट्र शासनाच्या २८ जुलै २०२३ च्या निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार करण्यात आला. १ जुलै २०२४ पासून राज्यातील सर्व अधिवासी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे पांढरे शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांचाही यामध्ये समावेश आहे. प्रत्येक कुटुंबाला वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात.
७० वर्षांवरील ज्येष्ठांनाही आरोग्य संरक्षण –
आयुष्मान वय वंदना योजनेंतर्गत ७० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण दिले जाते. यासाठी उत्पन्नाची अट नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळू शकते.
२,३९९ प्रकारच्या उपचारांची सुविधा –
या योजनेंतर्गत कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंडाचे आजार, अपघातातील दुखापती आणि इतर गंभीर आजारांवरील उपचार व शस्त्रक्रियांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार, २ हजार ३९९ उपचार पद्धतींचा लाभ घेता येतो. पाच हजारांहून अधिक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध असल्याचे शासनाने म्हटले आहे.
४.४५ कोटी आयुष्मान कार्ड तयार –
राज्यात आतापर्यंत ४ कोटी ४५ लाख आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली आहेत. तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी १२ लाख २० हजार वय वंदना कार्ड तयार करण्यात आली आहेत. जानेवारी २०२६ पासून नोव्हेंबरपर्यंत ७० लाख ८८ हजार ६९१ आयुष्मान कार्ड आणि ६ लाख ६ हजार ८५५ वय वंदना कार्ड तयार करण्यात आली आहेत.
असे तयार करा आयुष्मान कार्ड –
आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी अद्ययावत शिधापत्रिका, आधार क्रमांक आणि आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्र आणि स्वस्त धान्य दुकानांमधून कार्ड तयार करता येते. तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा आयुष्मान ॲपद्वारेही कार्ड तयार करण्याची सुविधा आहे.
योजनेची माहिती किंवा तक्रारींसाठी लाभार्थी जवळच्या अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्रांशी संपर्क साधू शकतात. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी १५५३८८ किंवा १८००२३३२२००, तर आयुष्मान भारत योजनेसाठी १४५५५ किंवा १८००१११५६५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधता येईल.




