Maharashtra Assembly Elections 2024 : ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या करता येणार मतदान; निवडणूक आयोगाने सांगितले…

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल आज अखेर वाजलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी जास्त महत्त्वाची आहे.
कारण महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या घडामोडींवर जनतेच्या मनात नक्की आहे ते जाणून घेण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.
आज (दि. 15) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. तसेच, 4 नोव्हेंबरला निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक असणार आहे.
यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, ‘आम्ही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्या दौऱ्यादरम्यान आम्ही निवडणुकीची तयारी योग्य प्रकारे झाली आहे की नाही? याची माहिती आम्ही घेतली.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही गोष्टी घडल्या होत्या त्या टाळण्यासाठी आम्ही आता पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. लोकांची मतदानासाठी रांग लागते त्यावेळी काही अंतरावर खुर्ची किंवा बाक रचण्याचा सल्ला आम्ही दिला आहे.
85 वर्षे आणि त्यावरच्या मतदारांना घरुन मतदान करता येणार आहे. तसंच या मतदारांच्या गोपनीयतेची काळजी आम्ही घेऊ त्यासंदर्भातली पूर्ण व्यवस्था आम्ही केली आहे. असंही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.
85 वर्षाच्या वरच्या व्यक्तीला घरून मतदान करता येणार !
ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणं सोपं जावं यासाठी 85 वर्षाच्या वरच्या व्यक्तीला घरून मतदान करता येणार आहे. फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम तिकडे जाणार आहे.
तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतलं जाईल. सर्व गोष्टींची व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. रेकॉर्ड ठेवलं जाणार आहे. प्रत्येक निवडणुकीत व्हिडीओग्राफी केली जाते.
महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती?
महाराष्ट्रात एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186
ग्रामीण मतदान केंद्र – 57 हजार 601
शहरी मतदार केंद्र – 42 हजार 582
एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख
दिव्यांग – 6 लाख 2 हजार
नवमतदार – 1. 85 कोटी
पुरुष मतदार – 4.97 कोटी
महिला मतदार – 4.66 कोटी
भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले :
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. या निवडणुकीत भाजप 105 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील एकसंध शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि 44 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आले होते.





