Maharashtra Assembly Elections 2024 : पर्वती विधानसभेतून पुन्हा ‘माधुरी मिसाळ’ यांना संधी!

माधुरी मिसाळ यांची राजकीय कारकिर्द
माधुरी मिसाळ ह्या भाजपच्या उमेदवार म्हणून पर्वती मतदारसंघातून २००९, २०१४, आणि २०१९ मध्ये सलग तीनदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण बीकॉम असून त्या २००७ पासून त्यांनी पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून काम केलं आहे.
पुणे भाजपच्या अध्यक्ष म्हणूनही काम
माधुरी मिसाळ पुणे शहर भाजपच्या अध्यक्ष देखील राहिल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीत पुणे महापालिकेत भाजपची सत्ता येण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे मानले जाते. विद्या सहकारी बँक आणि उद्यम सहकारी बँकेच्या संचालिका पदाचाही त्यांना अनुभव आहे.
उमेदवारी मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया
माधुरी मिसाळ म्हणाल्या, “गेल्या पंधरा वर्षात पर्वती परिसरासाठी मी केलेल्या विकासकामांची साक्षीदार असलेले मतदार मला पुन्हा एकदा विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील, याची खात्री आहे.”
इच्छूकांची निराशा?
पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षातील अनेक नेत्यांनी विधानसभेसाठी इच्छा दर्शवली होती. मिसाळ या तीन टर्म आमदार राहिल्याने पक्षाने यंदा भाकरी फिरवावी अशी इच्छा व्यक्त करण्यात येत होती. मात्र पक्षाने उमेदवारांच्या पहिल्याच यादीत मिसाळ यांना संधी दिल्याने इच्छूकांचा चांगलाच भ्रमनिरास झाला आहे.
अशात, पक्षातील इच्छूक बंडाचे निशाण फडकावणार की पक्षाचा आदेश सर्वोच्च मानून मिसाळ यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी करणार याचे चित्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
महाविकास आघाडीतही अनेक इच्छूक
महाविकास आघाडीमध्ये सध्या पर्वती विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच सुरु असल्याचे दिसते. येथून शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेतून इच्छूक मतदारसंघ आपल्याच वाट्याला यावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
एकीकडे भाजपने उमेदवार जाहीर केला असताना महाविकास आघाडी येथून कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उत्तरवते हे पाहणे रंजक ठरणार आहे.





