धारावीत काँग्रेसच्या रॅलीमध्ये घडली मोठी दुर्घटना; 9 वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे राज्यात प्रचाराला मोठा वेग आला आहे. या धामधुमीत मोठी दुर्घटना घडली आहे. धारावीत काँग्रेसच्या प्रचार रॅली दरम्यान ही दुर्घटना घडली. रॅलीतील फटाक्यांची आतषबाजी ही एका चिमुरड्याच्या जीवावर बेतली आहे. तो गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरु आहेत.
काय घडले नेमके?
13 नोव्हेंबर रोजी कामराज नगर येथे कॅाग्रेसची प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या आगमनावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. काँग्रेसच्या उमेदवार ज्योती गायकवाड यांच्या प्रचारासाठी रेवंत रेड्डी धारावीत आले होते. यावेळी करण्यात आलेल्या आतषबाजीत लहान मुलाच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला फटाक्यांच्या स्फोटामुळे गंभीर जखमा झाल्या. जखमी लहान मुलावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धारावी मतदार संघाबद्दल बोलायचे झाले तर हा पुनर्विकास प्रकल्पामुळे चर्चेतला मतदार संघ आहे. या मतदारसंघांमध्ये सध्या पुनर्विकास आणि सुविधांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजतो. या आधी या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार होत्या. खासदार झाल्यानंतर त्यांनी या मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि यावेळी त्यांच्या लहाण बहीण ज्योती गायकवाडांना उमेदवारी देण्यात आली. धारावी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.





