Maharashtra Assembly Election 2024 । राज्यातील विधानसभा निवडणुकीत काही विधानसभा मतदारसंघाची चांगलीच चर्चा आहे. त्यात चर्चेत सिल्लोड विधानसभा मतदारसंघही चांगलाच चर्चेत आला आहे. या मतदारसंघात महायुतीत संघर्ष बघायला मिळत आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार यांच्याविरोधात जहरी टीका केली आहे. अब्दुल सत्तार औरंगजेब आहेत. औरंगजेबाने आम्हाला धमकावू नये असा वादाचा नारळ, दानवे यांनी फोडला आहे. ऐन विधानसभेच्या तोंडांवर सिल्लोड मतदारसंघात महायुतीमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप शिंदेसेनेला मदत करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा नवीन वाद नाही, त्याला जालना लोकसभा मतदारसंघातील पराभवाची झालर आहे. त्याचे पडसाद आता सिल्लोड विधानसभा मतदारसंघात दिसतील, असा दावा करण्यात येत आहे. नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार औरंगजेब आहे. औरंगजेबाबद्दल मी काही बोलणार नाही. औरंगजेबाने आम्हाला धमकावू नये असा इशारा पण त्यांनी दिला. मला राज्यसभेवर आणि विधान परिषदेवर सुद्धा जायचं नाही मी पक्षाचे काम करणार आहे. आमच्याकडे लवंगी फटाके नाही तर बॉम्ब आहेत. ते येणाऱ्या काळात फुटणार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड च्या जनतेवर छाप टाकण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्यांना ते आता जमणार नाही, असा पलटवार त्यांनी केला आहे. अब्दुल सत्तारांना निवडणूक आयोगाचा झटका; दिला 24 तासांचा अल्टीमेटम मंत्री अब्दुल सत्तार यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. शिंदे गटाकडून सिल्लोड येथून उमेदवारी मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात मालमत्तेची माहिती लपवल्याची माहिती समोर आली आहे. मालमत्तेद्दल खोटी माहिती दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. मंगेश शंकरपेल्ली यांच्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.