Maharashtra Assembly Election 2024 : भाजपा आणि ‘मनसे’च्या युतीचं घोडं नेमकं कुठं अडलं? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं….

Devendra Fadnavis | Raj Thackeray : उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांची राज्यात सर्वाधिक ताकद मुंबईमध्ये आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सर्वाधिक ताकद ही ठाण्यानंतर मुंबईमध्येच आहे. मागच्या काही वर्षांत शिवसेनेच्या मदतीने भाजपने विदर्भ, मराठवाडा वगळता मुंबईत ताकद वाढवली आहे. त्यामुळे या सर्व राजकीय पक्षांच्या दृष्टीने मुंबई महत्त्वाची आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्यात लोकसभेला झालेली टक्कर आता आपण विधानसभेतही पाहण्यास मिळणार आहे. त्यात यावेळेला मनसेनेही मुंबईत मोठ्या संख्येने उमेदवार दिल्याने भाजप, शिवसेना आणि मनसे यांच्यातील रणसंग्राम अनुभवण्यास मिळणार आहे.
असं असलं तरी मध्यंतरी मनसे आणि भाजपा युती करणार अशी जोरदार चर्चा होती. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या मध्यंतरी अनेकदा भेटीगाठीही झाल्या होत्या. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र निवडणूक लढवणारच अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र गोष्टी जुळून आल्या नाहीत आणि दोन्ही पक्षांनी वेगवगळं निवडणूक लढवण्याचं ठरवलं.
मात्र दोघांमधील युती का फिस्कटली यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना स्वतः फडणवीसांनी यावर भाष्य केलं आहे. त्यावेळेस त्यांनी दादर-माहीम मतदारसंघातील मनसे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेमधील लढतीबद्दलही भाष्य केलं.
माहिम मधील गोंधळ सोडवण्यासाठी आपण स्वत: आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. आम्ही दोघांनी प्रयत्न केला असं सांगतानाच फडणवीसांनी, “परिषदेवर घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सारवणकर यांना सांगितलं होतं.
मात्र सारवणकर यांचं लॉजिक शिंदेंना पटलं,” असं सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “अमितला परिषदेवर घेऊ अशी ऑफर होती पण ते ठाकरे आहेत ते म्हणाले तुम्हाला द्यायचा उमेदवार तर द्या,” असं सांगण्यात आल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
भाजपा आणि मनसेची युती का झाली नाही…
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “राज ठाकरेंना सोबत न घेण्यामागील कारण हे जागवाटपाचं असल्याचं फडणवीसांनी सूचित केलं. “राज ठाकरेंना सोबत घेतलं असतं तर फार जागा देऊ शकलो नसतो,
मनसेची वाढ होण्यासाठी निवडणूक लढवणं आवश्यक होतं, असं फडणवीसांनी सूचित केलं. “निवडणूक नाही लढवली तर पक्ष वाढणार कसा?” असा उलट सवाल फडणवीसांनी विचारला.





