अग्रलेख : दावा कोणाचा…?

महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी बुधवारी मतदान झाले. महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसे मतदान शांततेत पार पडले. काही ठिकाणी बाचाबाची आणि क्वचित धक्काबुक्कीचे अथवा दमदाटीचे प्रकार घडले. फार गालबोट निवडणुकीच्या प्रक्रियेला लागले नाही. दुर्दैवी घटनांमध्ये एका महिला कर्मचार्याचा निवडणुकीच्या ड्युटीसाठी जाताना अपघाती मृत्यू झाला, तर बीड जिल्ह्यात एका अपक्ष उमेदवाराचाच आकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली.
सायंकाळी एक्झिट पोलचे निष्कर्षही जाहीर केले गेले. एक बाब मात्र या सगळ्यांत चांगली घडली व ती म्हणजे यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. तो फार वाढला नसला तरी लोकांमध्ये लोकशाहीप्रति आपल्या कर्तव्याची जाणीव रूजत चालल्याचे हे निदर्शक आहे. निकाल शनिवारी जाहीर होणार असल्यामुळे मधले जे तास आहेत त्यात दावे आणि प्रतिदावे यांना साहजिकच ऊत येणार आहे. राज्यात लढणार्या दोन्ही आघाड्यांनी आपला सत्तेवर दावा सांगितला आहे. वाढलेले मतदान आपल्याला फलदायी ठरणार असल्याचा त्यांचा विश्वास आहे. वास्तविक महाराष्ट्रात यंदा झालेल्या मतदानाने सर्वांना काहीसे चकित केले. त्याचे कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या 30 वर्षांनंतर पहिल्यांदा एवढे मतदान झाले आहे.
निवडणूक आयोगाकडून जी आकडेवारी उपलब्ध झाली आहे त्यानुसार राज्यात 65.1 टक्के मतदान झाले आहे. यापूर्वी मतदानाच्या टक्केवारीने 1995 मध्ये सर्वाधिक नोंद दर्शवली होती. त्या निवडणुकीत 71.69 टक्के मतदान झाले होते. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 61.39 टक्के मतदान झाले होते, तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हा आकडा 61.4 टक्के होता. त्या मानाने विचार करता लोकसभा अथवा मागच्या विधानसभेच्या तुलनेत यंदा मतदारांमध्ये अगदी बंपर नाही; पण थोडासा उत्साह जाणवला आणि तो मतदान केंद्रांवर दिसला. नेहमीप्रमाणे शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांत विशेष उत्साह दिसला. पुणे जिल्ह्यापुरते सांगायचे झाल्यास तीन मतदारसंघांतील मतदान सत्तर टक्क्यांच्या वर गेले, तर उर्वरित ठिकाणी त्यांनी सत्तरी गाठली.
बर्याच काळाने मतदानाचे आकडे उत्साहवर्धक आले आहेत त्यामुळे आणि यावेळेची विधानसभा निवडणुका ज्या वातावरणात झाली आहे त्यामुळेही वाढलेला टक्का कोणाला फलदायी ठरणार याबाबत राजकीय चिकित्सकांनाही जिज्ञासा आहे. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर काही मिनिटांतच मतदानोत्तर चाचणीचे अर्थात ‘एक्झिट पोल’चे निष्कर्ष जारी केले गेले. एकूण 9 संस्थांचे निष्कर्ष आले आहेत. त्यातील 7 संस्थांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुतीला कौल मिळणार असल्याचे भाकित केले आहे. दोन संस्थांचे निष्कर्ष महाविकास आघाडीला वरचढ ठरवणारे आहे. वाढत्या टक्क्याबद्दल त्यात फार विश्लेषण नाही, तथापि, जे कौल दाखवण्यात आले आहे ते सर्वसाधारण अपेक्षित होते असेच आहेत.
कोणा एका आघाडीला एकतर्फी बहुमत मिळेल याची सुतराम शक्यता नव्हती आणि नाही. अलीकडच्या काळात ‘एक्झिट पोल’ अपयशी ठरल्याचेही पहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजे एनडीएला बहुतांश एक्झिट पोलमध्ये 300 पेक्षा जास्त जागा मिळतील असे दाखवले गेले होते. एका पोलमध्ये एनडीएला चारशेपार करण्यात आले. प्रत्यक्षात तसे घडले नाही. लोकसभेनंतर हरियाणात झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून काँग्रेसचे सरकार येणार अशी हवा होती. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची भांडणेही सुरू झाली. प्रत्यक्षात निकाल हाती आले तेव्हा भाजपने या राज्यात केवळ हॅट्ट्रिकच केली नाही, तर आतापर्यंत केली नव्हती अशी कामगिरी केली.
केवळ भारतातच नाही तर अमेरिकेतही एक्झिट पोल अपयशी ठरले. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात जबरदस्त चुरस असल्याचे अगोदर सांगितले गेले. नंतर कमला हॅरिस यांचे पारडे जड असल्याचेही म्हटले गेले. प्रत्यक्षात ट्रम्प विजयी झाले व कमाल ही की जेवढी अपेक्षा त्यांनीही केली नसावी एवढ्या मोठ्या फरकाने ते विजयी झाले. अर्थात, एक्झिट पोल हा काही झोलाछाप व्यक्तीने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजासारखा नसतो. त्यामागे एक शास्त्र असते. पूर्वी अनेक वेळा त्यांनी वर्तवलेले भाकित खरेही ठरले आहे. किमान राज्यात किंवा देशात सत्ता कोणाकडे जाणार याचा अंदाज त्यातून मिळत असतो. टक्केवारीचा अभ्यास करण्यात आणि त्यातून काय होऊ शकते याचा अंदाज बांधण्यात काही राजकीय नेतेही धुरंदर असतात.
भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीस त्यांना लाभ होणार असल्याचा दावा करताना म्हणाले, की जेव्हा केव्हा मतदान वाढते तेव्हा ते आमच्यासाठी फायद्याचेच ठरते. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. त्याचा केवळ आम्हालाच नाही तर महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाला लाभ होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पक्षाला आणि त्यांच्या महाविकास आघाडीला लाभ होताना दिसतो आहे. राज्याच्या कल्याणाला प्राथमिकता देणारे सरकार निवडण्यासाठी महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने हे मतदान केले असल्याचे वाढत्या टक्केवारीवरून स्पष्ट होते, असे पटोलेंचे म्हणणे आहे.
मुळात महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या अडीच वर्षात झालेला चिखल सगळ्यांनी पाहिला आहे. गेल्या निवडणुकीत एकत्रपणे लढलेले आज एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. सख्खे मित्र, भावंडे आणि सगेसोयरे असे सगळेच परस्परांच्या विरोधात आहेत आणि प्रत्येकाचे चिन्ह बदलले आहे. अशा स्थितीत मतदारही गोंधळला आहे. त्यामुळे आता विभाजित झाले असलेले दोन मुख्य पक्ष पूर्वी एकसंध असताना त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तेथपर्यंतच साधारण पोहोचताना दिसतील. त्यामुळे प्रश्न राहतो भाजप आणि काँग्रेसचाच. या दोन पक्षांची स्थिती किती भक्कम राहते त्यावरच त्यांच्या आघाडी आणि युतीचे आणि भविष्यातील महाराष्ट्राच्या सरकारचे भवितव्य अवलंबून राहील.





