शेतकरी नेते रविकांत तुपकर ‘मविआ’ला देणार धक्का; ‘या’ उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय

Maharashtra Assembly Election 2024 : बुलढाण्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांची क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाणार नसल्याची भूमिका तुपकर यांनी घेतली आहे.
राज्यातील अनेक मतदारसंघात स्वच्छ चारित्र्याच्या, शेतकऱ्यांशी नाळ असलेल्या, चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या चांगल्या विचारांच्या अपक्ष उमेदवारांना पाठींबा देणार असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. दरम्यान, काही मतदारसंघात कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.
आगामी काळात तुपकर हे महाराष्ट्र दौरा करणार असून जवळपास 25 जागांवर उमेदवार देण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. लोकसभेला बुलढाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते. यावेळी त्यांचा निवडणुकीत पराभव जरी झाला असला तरी त्यांनी जवळपास अडीच लाख मत घेतली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मत विभाजन आणि नुकसान टाळण्यासाठी रविकांत तुपकर यांना सोबत घेण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीत सकारात्मक चर्चा होती. मात्र, आता त्यांना महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे.





