Maharashtra Assembly Election 2024 – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. मला पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला तर पक्षाकडून आणि नाही मिळाला तर अपक्ष म्हणून आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तसेच दुपारी 3 वाजेपर्यंत मला एबी फॉर्म मिळण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना अखेरच्या क्षणी एबी फॉर्म मिळाला असून आता पक्षाचे अधिकृत उमेदवारी म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. संकटाच्या काळात अजित पवार माझ्या आणि माझ्या कुटुंबासोबत उभे होते. त्यामुळे मी त्यांच्यासोबत राहणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते. पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले होते. त्यानुसार आता त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदेंचाही उमेदवार या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने देखील उमेदवार देण्यात आला आहे. मात्र माझ्या विरोधात कोण उमेदवार आहेत, कोण नाही? कोण कोणासोबत आहे? कोणता नेता आहे? हे मला माहित नाही. त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी या मतदारसंघातून निवडणूक लढणार असून माझा विजय निश्चित असल्याचा दावा देखील नवाब मलिक यांनी केला आहे. जनतेच्या आग्रहाखातरच आपण निवडणुकीला सामोरे जात असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. सना देखील निवडून येतील मी आणि माझी मुलगी सना मलिक दोघेही दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्या देखील निवडून येतील असा दावा नवाब मलिक यांनी यावेळी केला. मला कोण विरोध करत आहे ते माहित नाही, असे म्हणत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधाला प्रत्युत्तर दिले आहे. मी या निवडणुकीत जनतेच्या आग्रहाखातर उभा आहे. त्यामुळे मी विजयी होणारच असल्याचा दावा देखील त्यांनी केला.