Maharashtra Assembly Election 2024 : मोदी युगाचा लवकरच अस्त होणार – शरद पवार

मुंबई – विधानसभा निवडणुकीमुळे अवघ्या महाराष्ट्राचे रान पेटले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युगाचा अस्त समिप आल्याचे भाकित वर्तवले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप व त्यांच्या मित्रपक्षांच पराभव निश्चित आहे. त्यामुळे देशातील मोदी युगाचा अस्त लवकरच होईल, असे ते म्हणाले आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी एका हिंदी वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मोदी युगाच्या अस्ताची भाषा केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात भाजप व त्यांच्या मित्र पक्षांचा पराभव जवळपास निश्चित आहे. निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यास हा संदेश संपूर्ण देशात जाईल. पंतप्रधान मोदी देशाचे सरकार चालवत आहेत, पण त्यांच्यावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मदत घेण्याची वेळ आली आहे. हे दोन्ही नेते एकेकाळी त्यांच्या राजकीय धोरणांवर टीका करत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
बिहारमध्ये विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची पहिली बैठक झाली होती. त्यात नितीशकुमार यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती. भाजपविरोधात एक भक्कम पर्याय उभा करण्याची गरज आहे का? यावर त्यांनी भाषण दिले होते. अशांना सोबत घेऊन मोदी आज राज्यशकट हाकत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास देशातील मोदी युगाचा अस्त होत असल्याचा संदेश देशात जाईल, असे पवार म्हणाले.
महाराष्ट्रात आजही मोठे अंडरकरंट
ते पुढे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीत नेमक्या किती जागा जिंकणार हे आज सांगता येणार नाही. पण लोकसभा निवडणुकीत आम्हाला 48 पैकी 31 जागा मिळाल्या. महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. आजही लोकसभा निवडणुकीसारखेच अंडरकरंट महाराष्ट्रात आहे. येथील जनतेला परिवर्तन हवे आहे. पण महायुती त्याचा पैशाने सामना करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा किती परिणाम होईल हे पहावे लागेल. पण माझ्या मते हा फार काही मोठा मुद्दा नाही.
…तर तुमच्या साखरेला अमित शहांच्या मुंग्या लागणार – उद्धव ठाकरे
लोकसभेला लक्ष्मीदर्शन मात्र मते आम्हाला
लोकसभा निवडणुकीत बारामतीत मध्यरात्री लोकांना पैशांचे वाटप झाले. त्यामु्ळे त्याचा फटका निवडणुकीत आम्हाला बसेल अशी काळजी वाटत होती. पण आम्हाला त्या भागात प्रचंड मतदान झाले. यावरून हे सिद्ध झाले की, लोकांनी पैसे घेतले असले तरी त्यांनी मतदान आपल्या मतानुसारच केले, असेही पवार यावेळी म्हणाले.





