Maharashtra Assembly Election 2024 : सोलापूर जिल्ह्यात विधानसभेच्या ११ जागांसाठी १८४ उमेदवार

Maharashtra Assembly Election 2024 – सोलापूर जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा मतदार संघामध्ये ३३४ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते . सोमवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर १५० उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा मतदार संघामध्ये १८४ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे २५ आणि २४ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघांमधून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी माघार घेतली आहे.
याच मतदारसंघामधून सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी अपक्ष निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसचे अर्ज माघार घेतलेले उमेदवार दिलीप माने यांनी काडादी यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
एकनाथ शिंदे सेनेच्या सर्व उमेदवारांनी सुद्धा आपले उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीच्या उमेदवारासोबत राहण्याचा निर्णय सोमवारी घेतला आहे . पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात मात्र महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे.
या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यात बहुतांश मतदार संघात दुहेरी ,तिहेरी आणि चौरंगी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.





