Shirur News : मलठण येथे महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न

शिरूर : मलठण (ता. शिरूर) येथे शिरूर महसूल विभागाच्या वतीने सोमवारी (ता. २५) महाराजस्व अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात २९४ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी सर्व अर्जांचा तत्काळ निपटारा करत सदर अर्ज संबंधित विभागांकडे पाठवण्यात आल्याची माहिती मंडल अधिकारी विजय फलके यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू महाराजस्व अभियानांतर्गत हे शिबिर घेण्यात आले. शिबिरात सेतू नागरी सुविधा केंद्र, ग्रामपंचायत विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, भूमी अभिलेख व सार्वजनिक आरोग्य विभाग या खात्यांशी संबंधित अर्ज प्राप्त झाले होते.
तसेच, या शिबिरात ९३ नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे, ओळखपत्रे, दाखले व आदेश वितरित करण्यात आले. शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे महसूल प्रकरणांमध्ये प्रलंबित फेरफार जलदगतीने निकाली काढणे, खातेदारांना त्वरित सेवा उपलब्ध करून देणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता.
या शिबिराच्या माध्यमातून शासनाचा “नागरिक हित प्रथम” हाच दृष्टिकोन अधोरेखित झाला. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने राबवलेला हा उपक्रम ग्रामपातळीवर पारदर्शक प्रशासन व प्रभावी सेवा वितरणाचा आदर्श ठरला आहे.
यावेळी तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक, मंडल अधिकारी विजय फलके, वैद्यकीय अधीक्षक डॉ अतूल नागरे, सार्वजनिक वनीकरण चे बी जी पालकर, ग्राम महसूल अधिकारी मनीषा भालेराव शलाका भालेराव, दिलीप पवार, कोतवाल प्रिती नानेकर, योगेश पंचरास,ग्रामपंचायत अधिकारी चेतन वाव्हळ, सरपंच माधुरी थोरात, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
मलठण मंडलातील महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित उपक्रमास ग्रामस्थ, शेतकरी आणि लाभार्थी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकाच ठिकाणी विविध विभागांच्या सेवा मिळाल्यामुळे नागरिकांना वेळ व खर्च वाचल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त करण्यात आले.
बाळासाहेब म्हस्के – तहसिलदार शिरूर





