Akhilesh Yadav | उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोट्यावधी भाविकांनी आतापर्यंत महाकुंभमेळ्यात जाऊन पवित्र स्नान केले. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील गंगेत शाही स्नान केले. यावरून आता अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. ‘मी गंगेत स्नान केले आहे, आता गंगा कशी धुवणार?’ असा सवाल त्यांनी योगी सरकारला केला. काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव कन्नौजमधील एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर मंदिराचा परिसर गंगाजलाने शुद्ध करण्यात आला. त्याआधी उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार आल्यावर मुख्यमंत्री निवासस्थानही गंगाजलाने धुवण्यात आले होते. यावरून आता अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. अखिलेश यादव म्हणाले की, ‘भाजपच्या लोकांनी माझ्या जाण्यानंतर मंदिर आणि मुख्यमंत्री निवासस्थान गंगाजलाने धुतले. आता तर आम्ही तर गंगेत स्नान केले, आता गंगा नदीला कसे धुवणार?’, असा सवाल त्यांनी भाजपला केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाकुंभमध्ये गंगा-यमुनेचे पाणी आंघोळीसाठी योग्य नसल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता. यावरूनही यादव यांनी सरकारवर टीका केली. ‘जर राज्य सरकारच्या दाव्यानुसार तेथील पाणी स्वच्छ असेल, तर ते पाणी पिण्यास आणि जेवणासाठी भाजप नेत्यांच्या घरी पोहोचवले जावे.’, असे म्हणत अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.