MahaIT: तांत्रिक अडचणीमुळे दाखले मिळण्यात अडचणी
MahaIT:

महाआयटीची प्रणाली लवकरच कार्यरत होण्याची अपेक्षा
MahaIT: महाआयटीच्या डेटा सेंटरचे स्थलांतर आणि प्रणाली अद्ययावतीकरणाच्या कामामुळे आपले सरकारसह संबंधित शासकीय ऑनलाइन सेवा शुक्रवारपासून (दि. १६) पासून तात्पुरत्या बंद ठेवण्यात आली आहे.
त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रांमधून होणारी विविध दाखल्यांची कामे रखडली आहे. मंगळवारपासून (दि. २०) सर्व सेवा केंद्रातून कामकाज पूर्ववत होईल, असा दावा शासनाने केला आहे.
पोर्टल बंद असल्याने आपले सरकार केंद्रांमधून संबंधित दाखल्यांसाठी अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्जांवरील ऑनलाइन कार्यवाही करणे मागील तीन दिवसांपासून शक्य झाले नाही.
त्यामुळे उत्पन्न, अधिवास यांसारख्या दाखल्यांसाठी या सेवांवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या कामांना विलंब होत आहे. दाखल्यांची तातडीने आवश्यकता असलेल्या नागरिकांना सेवा पूर्ववत होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
शिष्यवृत्तीमध्येही अडथळे
या तांत्रिक कामाचा विपरित परिणाम महाडीबीटी पोर्टलवरही झाला असून, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. महाडीबीटी पोर्टलवर वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नाहीत. अनेक विद्यार्थी अंतिम मुदतीच्या जवळ आल्यामुळे तणावात आहेत. त्यांनी शासनाने अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.
पोर्टल बंद असल्याने कागदपत्रे अपलोड करणे, अर्ज सादर करणे आणि स्थिती तपासणे ही कामे करता येत नाही. विशेषतः इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गंभीर ठरत आहे. विद्यार्थ्यांना सोयीस्कर सेवा मिळावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक प्रशांत काळे यांनी सांगितले.





